छत्रपती संभाजीनगर : यंदा खगोलप्रेमींना निसर्गाची आतिषबाजी अनुभवता येणार आहे. शुक्रवार, १७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १८ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत पूर्वोत्तर दिशेला सिंह राशीतून उल्का वर्षाव होणार आहे. महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र व क्लब छत्रपती संभाजीनगरतर्फे ‘आंतरराष्ट्रीय उल्कावर्षाव संगठन’च्या मानांकनानुसार उल्का वर्षाव निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती असे एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.

दर ३३ वर्षांनी सूर्याला एक फेरी करणाऱ्या ‘टेम्पल-टटल/सी ५५’ या धुमकेतूच्या परिभ्रमणेमुळे उल्का वर्षाव होतो. यावर्षी सिंह राशीतील उल्का वर्षाव पाहण्याची शेवटची संधी आहे. पुढील दोन वर्ष या उल्का वर्षावाच्या दरम्यान चंद्रप्रकाशामुळे उल्का वर्षाव बघता येणार नाही. शुक्रवारी रात्री ९ वाजून २१ मिनिटांनी पश्चिम आकाशात चंद्रकोर मावळेल. यानंतर रात्रभर चंद्रप्रकाशाचा त्रास होणार नसल्याने उल्का वर्षाव निरीक्षण सोपे ठरणार आहे. यावर्षी सिंह राशीतील उल्का वर्षावाची उच्च पातळी ही भारतीय वेळेनुसार १८ नोव्हेंबरच्या पहाटे असल्याने जास्त संख्येने उल्का पाहण्याची संधी आहे. जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय उल्का संगठन (आयएमओ) यांनी विशेष उल्का निरीक्षण मोहिमेचे आयोजन केले आहे.

या मोहिमेत महात्मा गांधी मिशन एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र व क्लब, छत्रपती संभाजीनगरचा सहभाग आहे. या निरीक्षण मोहिमेत सहभागी सभासदास शहराबाहेर अंधाऱ्या ठिकाणी सुरक्षित व शास्त्रीय पद्धतीने उल्का वर्षाव पाहता येणार आहे. सोबतच ‘आकाशाला गवसणी’ही कृतिशील कार्यशाळा घेणात येणार आहे. आकाश दर्शन (नक्षत्रे-राशी व तेजस्वी ताऱ्यांची ओळख, दुर्बिणीचे प्रकार, दुर्बिणीतून ग्रह दर्शन व प्रश्नोतरे, आंतरराष्ट्रीय उल्का निरीक्षण मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल सहभागी प्रमाणपत्र मिळणार आहे. अधिक माहितीसाठी महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र एन-६, सिडको, एमजीएम स्पोर्ट्स क्लबसमोर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *