छत्रपती संभाजीनगर. :: झोपडपट्टीतही आता सुधारणा झाल्यात. त्यापेक्षाही वाईट अवस्था या किलेअर्कच्या वसतीगृहाची झाली आहे. म्हणून ॲक्शन हा एकमेव पर्याय आहे. कामात हयगय करणारांना गय किंवा माफी नसेल. जर हे मी करू शकलो नाही तर मी पण त्या लायकीचा नाही असे मी समजेल.’ अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी किलेअर्क येथील वसतीगृहाची पाहणी केल्यावर संताप व्यक्त केला.

सामाजिक न्याय विभागाचा पदभार स्विकारण्यापुर्वी त्यांनी अचानक पहिली भेट मंगळवारी (ता. २४) सकाळी साडे दहा वाजता दिली. दिड तास केलेल्या पाहणीत अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. मंत्री शिरसाट यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली. बाथरूम, नळ, तुटलेल्या तोट्या, फुटलेल्या काचा, आडोसा लावलेल्या खिडक्या, रिकाम्या पाण्याच्या टाक्या विद्यार्थ्यांनी दिखवल्या. तर वसतीगृहाच्या मागच्या बाजुस असेलेली घाण, स्वयंपाक घराजवळील फुटलेले ड्रेनेज, विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले. दरम्यान, मंत्री शिरसाट यांनी गृहपाल प्रदिप साळुंके यांची खरडपट्टी काढली. एक दिवस राहून दाखवा या खोल्यात. जरा तरी लाच बाळगा अशा शब्दात सुनावले.

‘किलेअर्क परिसरात समाज कल्याण विभागाचे एक हजार मुलांचे हे वसतीगृह आहे. इथे लिफ्ट बंद, सहाव्या मजल्यावर पाणी विद्यार्थी बकेटमध्ये घेवून जाताहेत. कॉट झोटे असून ते लहान मुलांचे आहेत. झोपायची निट व्यवस्था नाही. बाथरूमला, खोल्यांना काचा नाहीत. कपाटांना कडी कोंडेसुद्धा नाही. विद्यार्थी कपडे लावून अडोसा निर्माण करताहेत. भिती गळताहेत. स्वच्छता नाही. हा नुसता कोंडवाडा असून त्यात विद्यार्थी जनावरांसारखे कोंबल्याचे चित्र दुर्दैवी आहे. या विभागातर्फे यापुर्वी काय काम चालत होते याची कल्पना नाही. मात्र, चेहरा मोहरा बदलायची गरज आहे. ते मी करेन. १७ अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची गरज पण, पाच ते सात लोकांवर काम सुरू आहे. त्यातीलही काही लोक नियमती येत नाही. ही परिस्थिती गंभीर आहे. विद्यार्थी जीवनाशी, आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही. निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार.’ असे मंत्री शिरसाट यांनी माध्यमांना सांगितले.

‘निधीची कमतरता नाही. पण, अधिकाऱ्यांना रूची दिसत नाही. समाज कल्याण आयुक्तांची २६ डिसेंबरला पाहणी करून संपुर्ण अहवाल मागवेल. पुण्यात २८ डिसेंबरला सर्व समाजकल्याण अधिकाऱ्यांची बैठक घेवून ही परिस्थिती बदलण्यासाठी तातडीने पावले उचलू असे मंत्री शिरसाट म्हणाले.

तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पाहणी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकाऱ्यांना बोलावून संबधीत हॉस्टेलची पाहणी करून हॉस्टेल मध्ये असलेल्या अडचणी सोडविण्याचे आदेश दिले तसेच प्रस्ताव सादर करून निधी उपलब्ध करून देण्याचे देखील मंत्री शिरसाट यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *