छत्रपती संभाजीनगर : मतदान करण्यासाठी पैसे वाटप केले जात असल्याच्या अनेक घटना आजपर्यंत उघडकीस आल्या आहेत. मात्र, मतदान न करण्यासाठी पैसे दिल्याचा अजब प्रकार पश्चिम मतदारसंघात उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ पोलिसांना प्राप्त झाला होता. त्याबाबत सोमवारी (18 नोव्हेंबर) कारवाई करण्यात आली असून दोघांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. अटकेत असलेले दोघंही रिक्षा चालक असून त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती बिकट आहे. त्यांच्याकडे पैसे किंवा कागदपत्रं आढळून आलेले नाहीत. मात्र त्याबाबत पुढील तपास करत असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.
विधानसभा निवडणुकीच्या एका मतासाठी उमेदवारांकडून मतदारांना दीड हजार रुपये दिले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ते एक हजार देऊन आधार कार्ड आणि मतदान कार्ड जमा करून घेत होते. मतदानाच्या दिवशी ५०० रुपये घ्यायचे आणि मतदान करायचे. हा प्रकार इंदिरानगर येथे सोमवारी (१८ नोव्हेंबर) रोजी रात्री ८.३० वाजता समोर आला. जवाहरनगर पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी अशोक रामभाऊ वाकोडे (४२, रा.शंभूनगर) हा पैसे देताना, तर नदीम पठाण (रा. इंदिरानगर) हा पैसे घेताना पकडला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर मतदारसंघात पैसे वाटप सुरू झाले आहे. पश्चिम मतदारसंघातील इंदिरानगर भागात दोन जणांना पैसे वाटप करताना जवाहरनगर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिसांच्या माहितीनुसार, एका नागरिकाने परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त नवनीत काँवत यांच्याकडे पैसे वाटपाचा व्हिडिओ पाठवला होता. तोच व्हिडिओ काँवत यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेरमाळे यांना पाठवला. त्यानंतर शेरमाळे यांची टीम तातडीने इंदिरानगर येथे रात्री ८.३० वाजता दाखल झाली. त्या वेळी अशोक वाकोडे हा नदीम पठाण याला एक हजार देत होता आणि त्या बदल्यात नदीमकडून त्याचे आधार, मतदान कार्ड जमा करून घेत होता. त्यानंतर मतदानाच्या दिवशी ५०० रुपये घ्यायचे अन् आधार कार्ड-मतदान कार्ड घेऊन जायचे आणि मतदान करायचे वाकोडे सांगत होता. वाकोडेला हे काम करण्यासाठी जावेदने सांगितले होते. जावेद वाकोडेला एका मताच्या पाठीमागे २०० रुपये देत होता, असे पोलिसांच्या तपासात समोर आले. याप्रकरणी एफएसटी पथकाचे सागर गोरे यांच्या फिर्यादीवरून दोघांवर रात्री उशिरापर्यंत जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.
सरकारी शाई बाहेर आली कशी? पोलिसांनी कुणाच्या फोननंतर २ कोटींची रक्कम लपवली, हे जाहीर करावे. सरकारी शाई बाहेर कुणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली याची निवडणूक आयोगाने चौकशी करावी, संभाजीनगरात निवडणूक आयोगाला निष्पक्ष निवडणूक घ्यायची नाही का?
– अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते