छत्रपती संभाजीनगर. :: शेंद्रा एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट झालाय. येथील रेडीको एन व्ही कंपनीमधील मका साठवून ठेवणाऱ्या बॉयलरचा स्फोट झालाय. या स्फोटात आतापर्यंत तीन कामगारांचा मृत्यू झालाय. तर ७ ते ८ कामगार बॉयलर खाली दबलेले असल्याची प्राथमिक माहिती मिळालीय. बॉयलरची वेल्डिंग सुरू असतानाच बॉयलरमध्ये स्फोट झाला. स्फोट झाल्यामुळे बॉयलर कोसळले, त्याखाली ७ ते ८ कामगार दबल्या गेले आहेत.
याघटनेविषयी प्राथमिक माहिती अशी की, शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रॅडिको एन.व्ही.डिस्टलरीज ही मद्य निर्मिती कंपनी सन २००८ पासून कार्यरत आहे. या कंपनीत रोज ७०० ते ८०० कामगार कार्यरत असतात. या कंपनीच्या अंतर्गत असलेल्या स्टोअरेज विभाग आहे. तेथील एका टँकमध्ये ३ हजार टन क्षमतेच्या टाकीमध्ये मका साठवून ठेवण्यात आला होता. या टाकीजवळच कामगारांच्या येण्या-जाण्याचा मार्ग आहे. शु्क्रवारी दुपारी अडिच वाजेच्या सुमारास अचानक ही टाकी फुटली आणि त्यातील मक्याचा ढिगार तेथून ये-जा करणाऱ्या कामगारावर पडला. यामुळे हे कामगार मक्याच्या ढिगाराखाली दबल्या गेले.
या घटनेची माहिती मिळताच तेथे दाखल झालेल्या अग्निशामक दल, पोलिस आणि कंपनीतील कामगारांनी मदतीसाठी धाव घेतली. तेव्हा चार कामगारांना बाहेर काढण्यात यश आले. यातील दोन कामगार बेशुद्ध होते. या चौघांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. यासोबतच मक्याच्या ढिगाऱ्याखाली आणखी कामगार दबले असण्याची शक्यता लक्षात घेऊन जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीने शोध मोहिम सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच औद्योगिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी पी.व्ही. सुरसे यांनी घटनास्थळी धाव घेतली.