छत्रपती संभाजीनगर. :: आज सर्वत्र मोठ्या उत्साहात घटस्थापना करून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. शहरातील विविध माता मंदिरात देखील आज सकाळी घटस्थापना करून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. शहरातील कर्णपुरा माता मंदिर, बीड बायपास रेणुका माता मंदिर, जळगाव रोड येथील माता मंदिर, हर्सल येथील हरसिद्धी माता मंदिरासह आदी माता मंदिरात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हावून निघाला.
शहरातील कर्णपुरा मंदिरात आज पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या. तसेच शहरातील बीड बायपास येथील रेणुका माता मंदिरात देखील आज सकाळपासून हजारो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी प.पू. अप्पा महाराज यांच्या आदीपत्याखाली अमरीश महाराज आणि अनिवृद्ध महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजपूजन करून घटस्थापना करण्यात आली. यावेळी पहाटेपासून महिला भजनी मंडळींनी उपस्थित राहून भजन म्हंटले. सकाळपासून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फराळ वाटप करण्यात येत असल्याची माहिती सेवेकरी कचरू जाधव यांनी दिली. याशिवाय हसूल येथील हरसिद्धी माता मंदिरात देखील आज पहाटेपासून भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली. सकाळी घटस्थापना करून आरती करून नवरात्र उत्सव
सुरू झाला. यावेळी समस्त मंदिराचे विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कर्णपुरा माता मंदिरात आज सकाळपासून भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी करून दर्शन घेतले. यावेळी आज सकाळी ७ वाजता मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी सनईच्या चौघड्याच्या गजरात आरती करण्यात आली. यावेळी टाळ, मृदंगच्या गजरात पारंपरिक वादन करत आरती करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख किशोर कछवाह, राजू राजपूत, संतोष मरमट, पोपटराव दानवे, संतोष दानवे, राजेंद्र दानवे, अंकुश दानवे, रमेश दानवे, अभिजीत पगारे सह आदींची उपस्थिती होती.