छत्रपती संभाजीनगर. :: निराला बाजारात भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची घटना सिसिटीव्हीमध्ये कैद झाली आहे. निराला बाजार परिसरात असलेल्या पार्किंगमध्ये एक गाडी येऊन उभ्या गाड्यांवर धडकल्याने हा अपघात झाला. यात आठ ते दहा दुचाकींसह एका चारचाकी गाडीचे नुकसान झाले आहे. त्याचबरोरब चार जण जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास नागेश्वरवाडी ते निराला बाजार रस्त्यावर एचडीएफसी बँकेच्याजवळ एक कार उभी होती. महिला चालकाने कार सुरू करताच त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. सरळ न जाता कार अचानक समोरच्या रस्त्याकडे वेगाने पुढे गेली. याचवेळी नागेश्वरवाडी कडे जाणाऱ्या मोपेडला कारने जोरदार धडक दिली. यामुळे मोपेड चालक तरुण दूर फेकला गेला. यानंतरही कार न थांबता वेगाने तशीच पुढे जात समोरील पार्किंगमध्ये घुसली.यात आठ ते दहा दुचाकी वाहनांचं नुकसान झालं आहे. तर एका चारचाकी गाडीचं देखील नुकसान झालं आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यात चार जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात दोन तरुण थोडक्यात बचावले तर सात ते आठ दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. कार थांबल्यानंतर चालक महिला त्यातून उतरून पसार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली.