छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या सार्वजनिक आरतीसाठी सर्वच पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिवसेनेचे (उबाठा गट) नेते चंद्रकांत खैरेंचं नाव अगोदर घेतल्यामुळे शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार संदिपान भुमरे चांगलेच संतापले. त्यांनी घोडेले यांना प्रोटोकॉल पाळण्याचा सल्ला दिला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे खासदार संदिपान भुमरे यांच्यामध्ये हमरी तूमरी झाली असल्याचं पाहायला मिळालं.

गणेश चतुर्थीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती या ठिकाणी सार्वजनिक आरतीचे आयोजन करण्यात आलं होतं. या सार्वजनिक आरतीमध्ये मंत्री अतुल सावे, माजी मंत्री भागवत कराड, खा. संदिपान भुमरे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते. सार्वजनिक आरती झाल्यानंतर सर्व नेते व्यासपीठावर आले. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले नेहमीप्रमाणे सूत्रसंचालन करत होते. नंदकुमार घोडेले यांनी मंत्री अतुल सावे, खासदार भुमरे यांच्या अगोदर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे नाव घेतलं. यावरून भुमरे चांगलेच संतापले. ”हा घरचा कार्यक्रम नसून सार्वजनिक कार्यक्रम आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रोटोकॉल पाळा”, असा दम संदिपान भुमरे यांनी घोडेले यांना दिला. यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले ”प्रोटोकॉल पाळत नाही असं म्हण”. त्यानंतर व्यासपीठावर बसलेल्या चंद्रकांत खैरे यांच्याकडे बघत संदिपान भुमरे यांनी काहीतरी शब्द उच्चारले. यावेळी खैरे म्हणाले ”आता चूप बस” त्यावर भुमरे म्हणाले ”अय बोलायचं नाही…बोलायचं नाही…” असं म्हणत नंदकुमार घोडेले यांना म्हणाले देवाच्या ठिकाणी असं करायचं नाही. त्यानंतर व्यासपीठावरील इतर मान्यवरांच्या मध्यस्थीमुळे हा वाद मिटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *