छत्रपती संभाजीनगर. :: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेशासाठी ‘पेट’ परीक्षेचे आयोजन केले आहे. त्यानुसार पात्रताधारकांकडून १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले होते. त्यात १२७६ जागांसाठी तब्बल १४ हजार १२५ अर्ज दाखल झाल्याची माहिती प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनी दिली.

विद्यापीठ प्रशासनाने मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित ‘पेट’ परीक्षेसाठी १ जुलै पासून ऑनलाइन अर्ज मागविले होते. १५ ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार एकूण ४४ विषयांमध्ये होणाऱ्या पेटसाठी १४ हजार १२५ जणांनी ऑनलाइन अर्ज केले. त्यानंतर १५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान प्रत्यक्ष अर्ज पीएच.डी. विभागाकडे सादर करण्यात आले. या अर्जांची मागील तीन दिवसांपासून छाननी सुरू असल्याचेही डॉ. सरवदे यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठ प्रशासन पेट परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी घेण्याची तयारी करीत आहे. त्यानुसार अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र अर्जांची प्राथमिक यादी १० सप्टेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यावर आक्षेपासाठी सात दिवस मुदत असेल. १८ सप्टेंबर रोजी पात्रताधारकांची अंतिम यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ३ ऑक्टोबरला परीक्षा घेत १५ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यापीठ प्रशासनाने यूजीसीच्या नियमानुसार एम.फिल अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसह सेट, नेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पेटमधून सूट दिलेली आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना पेट २०२४ साठी नोंदणी करणे अनिवार्य केल्याचे डॉ. सरवदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *