छत्रपती संभाजीनगर. :: मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना या योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी असून या योजनांचा लाभ घेणे सोपे व्हावे म्हणून ग्रामपंचायतस्तरावर सुविधा करण्यात आली आहे, तरी ज्येष्ठ नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. तसेच जिल्हा, तालुका व गावपातळीवरील यंत्रणांनी लाभार्थ्यांना सहकार्य करावे,असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज दिले. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर दि.२३ व २४ रोजी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात यावे असे निर्देशही त्यांनी दिले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना अशा सर्व योजनांच्या प्रगतीचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक संचालक वराडे, सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय पी.बी. वाबळे, उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीमती अर्चना खेतमाळीस, डॉ. सुचिता शिंदे, महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव आदी अधिकारी हे मुख्यालयातून तर तालुकास्तरावरुन गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार हे दुरदृष्य पद्धतीने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी शासनाच्या योजनांचा आढावा घेतला. ज्येष्ठ नागरिक हे लाभार्थी असलेल्या वयोश्री योजना व तीर्थदर्शन योजना या योजनांचा लाभ देण्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही गावपातळीवर करुन द्यावी. तसेच या योजनांचा लाभ घेण्यासाठी वैद्यकीय तपासणी करणे ही पूर्वअट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामिण रुग्णालये येथे ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करुन त्यांना वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे. याबाबत गावपातळीवर जनजागृती करण्यात यावी,असेही जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले.

 लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बॅंक खात्यात जमा होणारी रक्कम कोणत्याही बॅंकेने कोणत्याही कारणासाठी परस्पर कपात करु नये,असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनीही बैठकीस मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *