छत्रपती संभाजीनगर –  क्रीडा व युवक सेवा संचालनालय व राज्य कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने  जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. छत्रपती संभाजीनगरचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव रविवार दि.२६ व सोमवार दि.२७ रोजी आयोजित करण्यात येणार असून या महोत्सवात जिल्ह्यातील युवक युवतींनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाप्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या आयोजनाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, कृषी विभागाचे दिवटे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे डॉ. मुन्तजीब शेख, राष्ट्रीय सेवा योजनेचे हनुमान गाडे तसेच अन्य विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

युवा महोत्सवात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे संघ सहभागी होऊन कलागुणांचे सादरीकरण करतील. त्यात समुह लोकनृत्य, वैयक्तिक नृत्य, लोकगीत, कथालेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, फोटोग्राफी, हस्तकला, वस्त्रोद्योग, कृषी उत्पादने  इ. प्रकारांचा समावेश आहे. सर्व कला प्रकारांचे सादरीकरणासाठी तृणधान्य उत्पन्नवाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ई संकल्पना देण्यात आली आहे,अशी माहिती  जिल्हा क्रीडा अधिकारी देसाई यांनी दिली.

स्पर्धेत सहभागासाठी १५ ते २९ हा वयोगट असून कृषी महाविद्यालय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, महिला मंडळातील युवक युवतींना या महोत्सवात सहभागी होता येईल.  अधिक माहितीसाठीजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *